रत्नागिरी, (आरकेजी) : काजू बीचे दर अचानक ११० ते १२० रुपयांवर आल्याने येथील काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बी बाजारात आली तेव्हा हाच दर १६० ते १३० रुपयांपर्यंत पोहचला होता.
जिल्ह्यात यावर्षी काजूचे उत्पादनात वाढ झाली आहे. पहिल्या मोहोरातील काजू उत्तम आला. मात्र दुसर्या टप्प्यातील काजूला बदलत्या हवामानाचा फटका बसून मोहोर काळा पडला. काही तालुक्यांना याचा फटका बसला.
कोल्हापूर जिह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड याठिकाणी काजूचे प्रचंड उत्पादन आले. उष्ण हवामानामुळे काजू लवकर तयार झाला आणि काजू बी एकदम बाजारात आली. त्यामुळे सुरुवातीला जी काजू बी बाजारात आली तिला १६० ते १७० रूपये किलो असा भाव मिळाला. आता हाच दर ११० ते १२० रुपयापर्यंत घसरला आहे. त्यामुळे सुरुवातीला समाधानकारक दर मिळाल्याने सुखावलेल्या काजू उत्पादक शेतकरी आता घसरत चाललेल्या दराने चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्ह्यातील काही काजू प्रक्रिया उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे यंदा काजू बी अधिक येऊनही काजू बीला उठाव नाही. त्यातच दर घसरले आहेत.