मुंबई : देशात जवळपास ५३ टक्के बालकांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक शोषण होते. हे रोखण्यासाठी आपल्या करुणेच्या सीमा फक्त आपल्या घरापुरत्याच मर्यादित न ठेवता प्रत्येकाने करुणेचा परिघ वाढविणे गरजेचे आहे. कोणत्याही बालकाचे शोषण हे आपल्याच बालकाचे शोषण आहे, असे समजून या समस्येचा सामना आपल्याला करावा लागेल. या भावनेसह बालकांचे लैंगिक व इतर प्रकारचे शोषण रोखण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध होवूया, असे आवाहन बाल हक्कासाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आज येथे केले.
सत्यार्थी यांनी ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ याविषयी भारत यात्रा काढली आहे. या यात्रेचे आज महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामार्फत स्वागत करण्यात आले. यासाठी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदना जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्यार्थी बोलत होते.
बाललैंगिक शोषणाबाबत चुप्पी सोडावी लागेल
ते पुढे म्हणाले, शिक्षणाला मुलभूत अधिकार बनविण्यासाठी यापूर्वीही आम्ही लाँग मार्च काढला होता. त्यावेळी जनतेसह लोकप्रतिनिधिंचाही पाठिंबा मिळाल्याने घटना दुरुस्ती होऊन लोकांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार प्राप्त झाला. पण यावेळची लढाई वेगळी आहे. लैंगिक शोषणावर मुक्तपणे बोलण्यास लोक तयार होत नाहीत. अनेक बालके त्यांचे लैंगिक शोषण झाल्यास भीतीपोटी ते सांगत नाहीत. जर त्यांनी पालकांना सांगितले तर इज्जतीच्या भीतीपोटी अनेक पालक हे शोषण दडवण्याचा प्रयत्न करतात. अनेक बालकांना त्यांचे झालेले लैंगिक शोषण समजत नाही. बालकांच्या लैंगिक शोषणावरची चुप्पी आपल्याला सोडावी लागेल. भीती, चुप्पी, औदासिन्य आणि मानसिक शैथिल्य सोडून आपल्याला या समस्येचा सामना करावा लागेल. आजनंतर बाल लैंगिक शोषणाची एकही घटना होणार नाही, असा निर्धार सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, एनसीआरबीच्या अहवालानुसार बाल लैंगिक शोषणाचे महाराष्ट्रात साधारण ४ हजार ८०० तर देशात साधारण १५ हजार खटले चालू आहेत. पण यातील फक्त ४ टक्के खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून ६ टक्के खटल्यांमध्ये आरोपींची मुक्तता झाली आहे. उर्वरीत ९० टक्के खटले प्रलंबित आहेत. यासंदर्भात आपण आज न्यायाधिशांसमवेतही चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
बालकांचे शोषण रोखण्यासाठी समाजाची मोठी जबाबदारी : पंकजा मुंडे
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या,बालकांची आणि विशेषत: मुलींची होणारी तस्करी हा गहन प्रश्न बनला आहे. जगातील हा मोठा काळा व्यवसाय ठरला आहे. हे रोखण्याची जबाबदारी सरकारची तर आहेच, पण त्याबरोबरच ती समाजाचीही जबाबदारी आहे. सुरक्षित बालपण आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी कैलाश सत्यार्थी यांनी उठवलेला आवाज सर्वांनीच संवेदनशीलपणे ऐकणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या बाल धोरणासंदर्भात श्री. सत्यार्थी यांनी काही सूचना द्याव्यात. त्याचा बाल धोरणात निश्चित समावेश केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
बालकांचे शोषण रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न : प्रविण घुगे
राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यावेळी म्हणाले,हरवलेल्या किंवा बाल तस्करीत अडकलेल्या अनेक बालकांची महाराष्ट्रात मुस्कान ऑपरेशनच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे. या कामी सर्व संबंधीत शासकीय घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समाजानेही हा प्रश्न संवेदनशीलतेने घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे बाल लैंगिक शोषण विरहीत बनविण्यासाठी बालहक्क आयोगामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी सत्यार्थी यांनी उपस्थितांना सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत निर्माण करण्यास कटीबद्ध होण्याची शपथ दिली. राज्य शासन,बालहक्क आयोग, युनिसेफ व विविध अशासकीय संस्थांमार्फत तयार करण्यात आलेल्या बालधोरणाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. बालहक्क आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी, आयोगाच्या वरिष्ठ अधिकारी संगिता श्रीवास्तव, युनिसेफच्या अल्फा व्होरा यांच्यासह बालहक्क चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.