
मुंबई । विक्रोळीच्या कन्नमवार नगरात कैलास पर्वतावरील मानसरोवर अवतरले आहे. सार्वजनिक उत्सव समिती गणेश मैदान या मंडळाने हा अप्रतिम देखावा साकारला आहे.
गणेशोत्सवात देखावे निर्माण करणे, सामाजिक संदेश देणे हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हीच परंपरा सार्वजनिक उत्सव समिती गणेश मैदान या मंडळाने जपली आहे. मंडळाचे यंदाचे 50 वे वर्ष आहे.
दूरवर असणाऱ्या धार्मिक पर्यटनस्थळी अनेकांना जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्यटन स्थळांचा देखावा साकारून पाहता यावीत, असा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा प्रयत्न असतो.
तिबेटच्या पठारावर ६,६३८ मीटर इतक्या उंचीवर असलेल्या कैलास मानसरोवर पर्वताचा गणेश मैदान येथील मंडळाने देखावा साकारला आहे. सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज या नद्यांचा उगमही दाखवण्यात आला आहे. शंकराच्या मूर्तीसह श्री गणेशाची सुबक मूर्ती विराजमान झाली आहे. पर्वतामधील शांत शीतल वातावरण दाखवण्यात आले आहे. देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे .
कैलास पर्वताचे स्थान पवित्र आहे. दरवर्षी नवीन कलाकृती बनविण्याचा प्रयत्न असतो. मंडळाने सामाजिक भान राखत कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली आहे, असे मंडळाचे विजय सोनमळे यांनी सांगितले.














