अधिक मासामुळे यावर्षी एक महिना उशिराने येत असलेल्या श्रावणाची चाहूल आता ऐकू येऊ लागली आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आषाढ महिना महत्वाचा ठरतो. खास करून, आषाढ अमावास्येला मांसाहारांची मोठी चंगळच आपल्याकडे दिसून येते. अश्या या मांसाहारप्रेमी खवय्यांसाठी ‘खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत’ मध्ये ‘गटारी महोत्सव’ भरवण्यात आला आहे. मालवणी जेवणाची लज्जत चाखू इच्छिणाऱ्या तमाम खवय्यांची यंदाची गटारी अविस्मरणीय करायची असेल, तर या हॉटेलमध्ये नक्की जा. कारण, आईच्या हाताची चव असणा-या खडपेज यांच्या जिन्नसांचा आस्वाद घेण्याची संधी १४ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान खवय्यांना लाभणार आहे. या खास गटारी विशेष दिवसांमध्ये ‘खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत’ च्या मेन्यू कार्डवर ओला जवळा भजी, बोंबील भजी, कालवं रोल, चिकन मिसळ, मटण खिमा मिसळ आणि बिस्कीट अंबाडे अश्या खास डिशेशचा समावेश करण्यात आला असून, हे सर्व जेवण अगदी माफक दरात लोकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोकणी जेवण म्हंटले, कि सर्वात आधी नजरेसमोर येतात ते मासे. समुद्रातील ताजे आणि सुके अश्या दोन प्रकारचे मासे जेवणाची लज्जत वाढवत नसतील तर नवलच ! तळकोकणातील या घरगुती लज्जतीचा आस्वाद शहरात मिळणे तसे दुर्मिळच. मात्र, प्रभादेवीच्या अप्पा साहेब मराठे मार्गावर असलेल्या ‘खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत’ मध्ये ते शक्य आहे. कारण, कामानिमित्त शहरात स्थायिक झालेल्या कोकणी माणसाला घरगुती पद्धतीच्या मालवणी जेवणाची चव या रेस्टॉरंटमध्ये अनुभवता येते.
शेफ पंकज नेरुरकर आणि विशाल करंगुटकर यांच्या या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना अस्सल कोकणीमालवणी पदार्थांची लज्जत चाखता येते. आपल्या आई कडून शिकल्यामुळे आईच्या हाताची चव या पदार्थात उतरली असल्याचे शेफ पंकज नेरुरकर इथे सांगतात.
आईने बनविलेल्या जेवणाला तोड नसते, आईच्या याच जेवणाची खासियत या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळते. पापलेट, सुरमई, रावस , बांगडा, बोंबील, मांदेळी या माश्यांच्या फ्राय डिशपासून ते अगदी बोंबील भुजणं, किसमूर, मोरीचं कालवण,कुर्ल्या मसाला, तिसऱ्या सुके ,जवळा मसाला, कोलंबी कोळीवाडा आणि खेकडे असे एकामोगामाग एक तोंडाला पाणी सुटेल अश्या रुचकर मेजवानीचे मेन्यूकार्डच इथे आपल्याला मिळते.
मालवणची अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेली कोळंबी डिश खवय्यांना एक वेगळा आनंद देऊन जाते. तव्यावर खरपूस तळलेल्या या कोळंबीचा आस्वाद आणि दरवळणारा सुगंध खाणाऱ्यांचा आत्मा तृप्त करून टाकतो. थाळीची आवड असणाऱ्यांसाठी चिकन, मटण, फिश, अंडा, व्हेज अशा सर्व थाळ्या तुम्हाला येथे मिळतील. शिवाय मांसाहारी स्पेशल आणि तळलेले मासे या शीर्षकाखालीही अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
खडपे हे तळकोकणातले प्रसिद्ध आचारी. त्यांचं जेवण चवीला अप्रतिम असतं. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून पंकज यांनी आपल्या रेस्टॉरंटचं नाव खडपेज् ठेवलं आहे. इथे लागणारा प्रत्येक मसाला आणि तेल कुडाळ ला त्यांच्या गावावरून तयार होऊन येतं. तिथे त्याचं स्वत:चं कांडप मशीन आणि खोबऱ्याच्या तेलाचा घाणा असल्याने भेसळीची शक्यता नसते आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण वापरून हवा तसा मसाला तयार केला जातो. तसेच, पदार्थ बनविण्यासाठी लागणारे मासे स्वतः पंकज बाजारातून खरेदी करत असल्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये पाऊल टाकताच स्वयंपाकघरातून येणाऱ्या मसाल्याच्या आणि ताज्या मासळीच्या वासाने जीभ ही चाळवतेच !
याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या पदार्थांचे दर अगदी माफक आहेत. त्यामुळे खिशाला फार फटका बसत नाही. येथे अस्सल मालवणी आणि नोनव्हेज पदार्थांची चव चाखायला दूरदूरून खवय्ये येतात. येथे व्हेज थाळीदेखील आहे. त्यात काळ्या वाटाण्याची उसळ, वालाची आमटी, मटकीची उसळ आणि भाजणीच्या पिठातून तयार करण्यात येणारे भाजणी वडे, तांदळाच्या भाकऱ्या आहेत. मोदक आणि श्रीखंड हे गोड पदार्थदेखील इथे सुरेख मिळतात.
त्यामुळे, आषाढ महिन्याच्या बेधुंद पावसाळ्यात जिभेला मालवणी पदार्थ खाण्याची लत लागली असेल तर ‘खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत’ मध्ये नक्कीच जा.