मुंबई: कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करा, अशी मोहीम पालिका राबवित आहे. आतापर्यंत केवळ २३४ गृहनिर्माण संस्था व आस्थापनांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. बहुतांशी संस्थांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे पालिकेला सहकार्य न करणाऱ्या संस्थांच्या आवारातील कचराच उचलणार नसल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबईत यामुळे कचरा वर्गीकरणाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टिने महापालिकेचा प्रयत्न आहे. सातत्याने याबाबत जनजागृती करूनही नागरिकांमध्ये याबाबत उदासीनता आहे. रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही मोठे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या पाच हजार ३०४ सोसायट्या व आस्थापना आहेत. त्यांच्यापैकी २३४ संस्थांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यानी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन विल्हेवाट लावावी असे आदेश पालिकेचे आहेत. त्याशिवाय मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण होणारा कचरा त्याच भागात प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा अधिक सोसायट्यानी याची अमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे २० दिवसांत जास्तीच जास्त सोसायट्यानी याची अमलबजावणी करावी यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहे. मात्र तरीही अमलबजावणी न झाल्यास अशा सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांचा कचरा येत्या २ ऑक्टोबरपासून न उचलण्याच्या निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारात कशी लावावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन आणि ‘हेल्प डेस्क’ लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.