
रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबेशेत गावचे सुपुत्र, रत्नागिरी पोलीस कबड्डी संघाचे तसेच झुंजार क्रीडा मंडळ रत्नागिरीचे ज्येष्ठ कबड्डीपटू धर्मादास सावंत यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने कै. रमेश देवाडीकर ‘श्रमयोगी कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त नुकताच ‘कबड्डी दिन’ कार्यकम ठाणे येथे साजरा झाला. यावेळी धर्मदास सावंत यांचा हा गौरव करण्यात आला.
धर्मदास सावंत यांनी रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाचे अनेक वर्ष प्रतिनिधीत्व आणि कर्णधारपद भूषवलेले आहे. जिल्ह्यामध्ये असंख्य कबड्डीपटू तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कबड्डीचा प्रसार रत्नागिरीतील कानाकोपऱ्यात होण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. ज्या भागात कबड्डी खेळ खेळला जात नव्हता, अशा ठिकाणी जाऊन कबड्डीच्या प्रसारासाठी धर्मादास सावंत यांनी अनेक मंडळांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. त्यामुळे कबड्डीच्या प्रसार आणि प्रचारासाठी धर्मादास सावंत यांनी मोठे योगदान दिल्याने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.