मुंबई : राज्यातील ३६ हजार ८६४ कारखान्यांत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. भविष्यात धोकादायक आणि अतिधोकादायक कारखान्यात प्राणघातक अपघात होऊ नये यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश कामगार मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांनी दिले.
मंत्रालयात आज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाच्या कामकाजाच्या आढावा बैठक झाली. निलंगेकर यांनी संबंधित अधिकार्यांकडून कारखान्यात होणार्या विविध अपघातांची माहिती घेतली. कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, उपसचिव (आयएएस) श्वेता सिंघल, औद्यागिक सुरक्षा व आरोग्य संचालक जयेंद्र मोटघरे, उपसचिव राजीव पोरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मागील वर्षी कारखान्यांमध्ये झालेल्या अपघातांची माहिती निलंगेकर यांनी घेतली. नागपूर , लातूर , डोंबिवली अशा विविध ठिकाणी धोकादायक, अतिधोकादायक आणि रासायनिक कारखान्यात घडलेल्या घटनेवर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने केलेल्या कारवाईविषयी माहिती घेतली. तसेच, भविष्यात असे प्राणघातक अपघात होऊ नये यासाठी काय कारवाई करण्यात येणार यासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रधान सचिव बलदेव सिंह यांनी सांगितले की, कारखान्यांच्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात यावे. सुरक्षेचे मापदंड , सुरक्षा लेखा परिक्षण , सुरक्षा अधिकारी या सर्व बाबींची पूर्तता केली आहे की नाही, याचा अहवाल तयार करण्यात यावा. आतापर्यंत झालेल्या अपघातांची कारणे शोधून कृती आराखडा तयार करण्यात यावा. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले जातात का, यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही ते पुढे म्हणाले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील एकूण कारखाने , कामगारांची संख्या, अपघात व त्याविषयीची कायदेशीर कारवाई यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.