नवी दिल्ली : चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते कासिनाथुनी(के.) विश्वनाथ यांना देण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने २०१६ या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी के.विश्वनाथ यांच्या नावाच्या केलेल्या शिफारसीला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संमती दिली. भारतीय चित्रपटाच्या विकासासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. सुवर्ण कमळ, १० लाख रोख आणि शाल या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
मानवी आणि सामाजिक विषयांवरचे त्यांचे चित्रपट समाज मनाला मोठ्या प्रमाणात भावले आहेत. आंध्र प्रदेश मध्ये जन्मलेल्या विश्वनाथ यांनी कला, संगीत आणि नृत्य अशा विविध संकल्पनांवर आधारीत चित्रपटांच्या मालिकाही केल्या आहेत. ‘शंकराभरणम्’ या त्यांच्या चित्रपटाला जगभरातून प्रशंसा लाभली आहे.
१९९२ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.