मालाड, ता.20 (वार्ताहर) : नारी शक्ती आणि युवा शक्ती पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार संघ येथे ओबीसी वादी चळवळीच्यावतीने दिनांक 19 डिसेंबर रोजी संपन्न झाला. निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या 21 महिला व 21 तरुणांना अध्यक्ष संजय ढाकु कोकरे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी सन्मानपत्र व पैठणी देण्यात आले.
मालाड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या संस्थापक-सचिव वैशाली महाडिक सय्यद यांना गौरविण्यात आले. लॉकडाउन आणि कोरोना महामारीच्या भयंकर काळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबग्रस्त असूनही वैशाली यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी “अपनी सुरक्षा अपने हाथ महामारी पर करेंगे मात”ही शोधमोहीम मालवणी-मालाड परिसरात राबवली. धान्य, मास्क, हँड सॅनिटायझरचे वाटप केले. घरोघरी गल्ली गल्लीत मोफत औषध फवारणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार अवघ्या 4 महिन्याच्या कालावधीत 2 रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 105 रक्त पिशव्या रक्त संकलन वैशाली यांच्या माध्यमातून करण्यात आले. लॉक डाउनने प्रभावित नोकरी व्यवसाय गमावलेल्यांना नवीन नोकरी मिळवून देण्याचे कार्य निस्वार्थपणे केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ओबीसीवादी चळवळीने नारी शक्ती सन्मानाने त्यांचा गौरव करत त्यांना मानपत्र आणि पैठणी दिली.
‘सन्मान, पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच. पण जबाबदारी ही वाढली आहे. समाजासाठी केलेल्या सेवेची ओबीसीवादी चळवळीने दखल घेतल्याबद्दल अध्यक्ष संजय ढाकु कोकरे यांचं मनापासून आभार तसेच इतर पुरस्कार प्राप्त महिला आणि तरुणांचा ही अभिनंदन’ अशी प्रतिक्रिया वैशाली महाडिक यांनी दिली.














