रत्नागिरी दि. 14: सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय,भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यांत जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD),सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाँडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फाँडेशनद्वारे चालविली जाते. या राष्ट्रीय हेल्पलाइन चा टोल फ्री क्र. १४५६७ हा असून कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर झाली असेल किंवा अत्याचार ग्रस्त असेल तर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्यांना मदत मिळवून देता येईल.
या राष्ट्रीय हेल्पलाइन चा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेणे व त्यांना आवश्यक असणा-या इतर सेवा देणे हा आहे.
तरी जिल्हयातील सर्व नागरिक,जेष्ठ नागरिक , जेष्ठ नागरिक संघ, स्वयंसेवी संस्था यांनी सदर हेल्पलाइन सुविधेचा वापर करावा असे आवाहन श्री. एस.एस. चिकणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी हे करीत आहेत.














