रत्नागिरी (आरकेजी): जस्टीस लोहिया यांच्या खून प्रकरणी लोकांची भावना तीव्र आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने याचा पुनर्विचार करावा व याचिका दाखल करून घ्यावी, असे मत काँगेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मांडले. राजापूरमध्ये ते बोलत होते.
जस्टीस लोहिया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाणार परिसराच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार हुसेन दलवाई यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या प्रकारे जस्टीस लोहिया यांचा मृत्यू झाला, त्याचं निराकरण करणं हे न्यायालयाचे काम आहे. सुप्रीम कोर्टाला अनेक अधिकार आहेत. त्यामुळे लोहिया यांच्या मृत्यूची चौकशी होणे गरजेचे आहे. या अगोदर सुप्रीम कोर्टाच्याच न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी सरकारने काहीही भूमिका घेतली नाही. हे सरकार सगळ्यांना गुंडाळायला लागले आहे. असे सांगत सरकारच्या कारभारावर दलवाई यांनी जोरदार ताशेरे ओढले.