
मुंबई, 15 सप्टेंबर 2025 : भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
बन म्हणाले की, भारतीय क्रिकेटपटूंनी आशिया कपमध्ये पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवला. या विजयाची तुलना नवनाथ बन यांनी ऑपरेशन सिंदूरशी केली. त्यांनी सांगितलं की, जसं भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना खातमा करून धूळ चारली, तसंच काल भारतीय क्रिकेटपटूंनी मैदानात पाकिस्तानला नामोहरम केलं.
बन म्हणाले, “भारत म्हणजे बाप – मग ते रणांगण असो किंवा खेळाचं मैदान. भारत जिंकतो आणि पाकिस्तान हरतो. पण संजय राऊत मात्र भारताच्या विजयाने दुःखी होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होतो, कारण पाकिस्तान हरतो तेव्हा राऊत निराश होतात.”
मॅचवर थुंकण्याचा अधिकार तुम्हाला नाही, देश तुमच्यावर थुंकेल– नवनाथ बन
संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर फिक्सिंगचे आरोप करत “मॅचवर आम्ही थुंकतो” असं वक्तव्य केलं. यावर नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला.
त्यांनी म्हटलं, “क्रिकेटपटूंचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही. पराक्रमी खेळाडूंनी पाकिस्तानला पराभूत केलंय, आणि त्यावर तुम्ही थुंकण्याची भाषा करता? जर तुम्ही मॅचवर थुंकत असाल, तर 140 कोटी जनता तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. कारण भारताचा विजय हा देशाचा अभिमान आहे.”
कुंकवाची भाषा तुमच्यासारख्यांना शोभत नाही, कारण तुम्ही सोनिया-राहुलचे कुंकू लावलेले आहात
संजय राऊत यांनी ‘माझं कुंकू माझा देश’ असं अभियान जाहीर केलं होतं. त्यावर नवनाथ बन यांनी अतिशय प्रखर भाषेत प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, “कुंकवाची भाषा तुमच्यासारख्यांना शोभत नाही. तुम्ही कोणाचं कुंकू लावलंत? सोनिया गांधींचं की राहुल गांधींचं? हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या बुटांची चाकरी करणाऱ्यांना कुंकू, देश, संस्कार यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हाला या पाकिस्तानप्रेमामुळे बाहेर हाकललं असतं.”
भारत हरला असता तर राऊतांनी फटाके फोडले असते, कारण त्यांचा सट्टा पाकिस्तानवरच
राऊतांनी सामन्यावर दीड लाख कोटींचा जुगार खेळल्याचा आरोप केला होता. यावर नवनाथ बन यांनी थेट राऊतांवरच संशय व्यक्त केला.
ते म्हणाले, “राऊत साहेब, तुम्हीच सांगा, काल किती पैसे हरलात? पाकिस्तानच्या विजयावर पैसे लावले असणार, त्यामुळे पाकिस्तान हरल्यावर तुमचा चेहरा उतरला. भारत हरला असता तर तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला असता. पण पाकिस्तान हरल्यामुळे तुमचा सट्टा बसला आणि चेहरा पडला.”
जनतेने तुम्हाला उलट टांगलं, आणि फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले
राऊतांनी भाजप नेत्यांना ‘चिटकवलेले’ असं संबोधलं होतं. यावर नवनाथ बन यांनी तिखट शब्दांत हल्ला केला.
ते म्हणाले, “चिटकवलेले तुम्ही आहात. राहुल गांधींनी, शरद पवारांनी तुम्हाला चिटकवलं. पण विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तुम्हाला उलट टांगलं. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राने तीन वेळा मुख्यमंत्री करून कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केलं. 132 जागांचा विक्रमी विजय मिळवून दिला. मग कोणाला जनता स्वीकारते हे स्पष्ट आहे.”
राऊतांनी शिवसेना उध्वस्त केली, राहुल गांधींचे बूट चाटून हिंदुत्वाला धोका दिला
नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर शिवसेनेच्या पतनाचा थेट आरोप केला. ते म्हणाले, “तुम्ही शिवसेना उध्वस्त केली, हिंदुत्वाला धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धोका देऊन सोनिया गांधींच्या दारात गुडघे टेकलात. राहुल गांधींच्या बुटांची पावलं चाटत नक्षलवाद्यांचा समर्थन केलंत. त्यामुळे आज तुमचा पक्ष १४-१५ जागांवर येऊन थांबला आहे.”
मराठी माणसासाठी काम देवा भाऊंनी केलं, मराठीला मुंबईतून हाकललं ते उबाठा गटाने
संजय राऊतांनी मराठी माणसासाठी आंदोलन केल्याचं सांगितलं. त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, “मराठी माणसाला मुंबईतून हाकललं ते तुमच्याच गटाने. बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत ५० लाख ठेवून सामान्य मराठी कुटुंबांना मुंबईबाहेर ढकलण्याचं काम तुम्ही केलं. उलट देवेंद्र फडणवीसांनी परवडणाऱ्या किमतीत घरं देऊन मराठी माणसाला मुंबईत घर दिलं. त्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही.”
















