
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ‘ह’ प्रभाग अंतर्गत असणाऱ्या ठाकूरवाडी – जुनी डोंबिवली विभाग रस्त्याची खड्यांमुळ चाळण झाली आहे. जुनी डोंबिवली चौक ते ठाकूरवाडी रस्त्यातील मोठ्या खड्यात पाणी साचून संपूर्ण भाग जलमय झाला आहे. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती असल्याने रिक्षा चालकांनी त्या विभागात रिक्षा न चालविण्याचे धोरण राबविल्याने तेथील नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे. स्थानिक नागरिक व रिक्षा चालकांच्या आंदोलनामुळे पालिका अधिकाऱ्यांना जाग आली असून आता त्या रस्त्यातील खड्डे ‘कोल्डमिक्स’ प्रणालीने बुजविण्यात येणार आहेत.
महापालिका परिक्षेत्रातील रस्ते पावसामुळे खड्डेमय होऊन रस्त्यांची चाळण होत होती. पालिका प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी विकास योजने अंतर्गत निधीची व्यवस्था केली. या योजने अंतर्गत मुख्य रस्ते कॉंंक्रीटचे झाले. परंतु यामध्येही दुजाभाव झाल्याचा आरोप करण्यात आला होता. शहराच्या पायाभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींना प्रभागातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणत निधी दिला जातो. परंतु त्याचा विनियोग ठोस कामांसाठी न करता पायवाट-गटारे यावरच खर्ची होतो अशीही तक्रार केली जाते. या निधीतूनही ठोस कामे केली गेली तर अनेक समस्या सुटू शकतात. पण पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत नसल्याने नागरिक त्रस्त होत आहे. जुनी डोंबिवली विभागाला लागून असणाऱ्या प्रतिनिधींनी जर रस्त्याचे ठोस काम म्हणून लक्ष दिले असते तर त्यांच्या निधीतूनही हा रस्ता सिमेंट कॉंक्रीट झाला असता आणि खड्यांची समस्या सुटली असती.
खरं तर मे महिन्यातच रस्त्याचे योग्य प्रकारे डांबरीकर केले असते तर ही समस्या निर्माणच झाली नसती. मे महिन्यात स्थानिक रिक्षा चालकांनी पावसाळ्यातील पुढील समस्या ओळखून याबद्दल प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. परंतु त्यावेळीही उडवा-उडवीची उत्तरे देऊन दुर्लक्ष करण्यात आल्याचे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी विलास पंडित यांनी सांगितले. मात्र आज याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. जुनी डोंबिवली चौक ते ठाकूरवाडी रस्ता पूर्णपणे उखडला असून साधे चालणेही कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे असे प्रश्न विचारले जात आहेत. रिक्षा संघटनेने फलक लावून प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त केली असून आम्ही खड्डेमय रस्त्यात रिक्षा कशा चालवायच्या असा प्रतिप्रश्न केला आहे.
याबाबत महापालिका अधिकारी नंदकुमार पाथरे यांनी पावसाळा आहे, डांबर प्लाँट बंद आहे, खडी-माती टाकून खड्डे बुजवू असे प्रातिनिधिक उत्तर देऊन या समस्येला बगल दिली. परंतु या कठीण समस्येबाबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘कोल्डमिक्स’ पद्धतीने हा प्रश्न निकाली लावता येईल असे शहर अभियंता प्रशांत भुजबळ यांनी सांगितले. यामुळे जुनी डोंबिवली विभागातील रस्त्यातील खड्डे ‘कोल्डमिक्स’ प्रणालीने बुजाविण्यात येणार आहेत.















