मुंबई, 4 ऑगस्ट (निसार अली) : रात्रभर सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका सखोल भागांना बसला. मालवणी, पोईसर येथील अनेक घरांत पाणी शिरले.
मालवणी येथील सानेगुरुजी वसाहत ब्लॉक क्रमांक 3 येथील काही घरात पावसाचे पाणी शिरले. हनुमान मंदिर लगतच्या रस्त्यावर देखील पाणी साचले होते. आझमीनगर येथे तसेच राबोडी येथे पावसाचे पाणी साचले होते. मालाड झकरिया रोड येथील चिकणे वाडीत घरात पावसाचे पाणी शिरले होते. एसव्ही रोडवर जागो जागी पाणी साचले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. तसेच व्हॅनिला तलाव भरल्याने व काही ठिकाणी संरक्षण भिंत तुटल्याने पाणी जवळच्या वस्तीत शिरले. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता. तोही पाण्यासकट वस्तीत आल्याने दुर्गंधी पसरली.
पोईसर येथील होली क्रॉस रोडवर पाणीच पाणी
कांदिवली पश्चिमेतील पोईसर येथील होली क्रॉस रोडवर असलेल्या पाटील हाऊस व आजूबाजूच्या परिसरातील घरात पहाटे 4 वाजता पासून पावसाचे पाणी शिरले होते. ज्या रहिवाशांचे दोन मजली घर होते. त्यांनी पहिल्या मजल्यावर धाव घेतली. इतरांना दुसरीकडे जावे लागले. मोठा नाला भरल्याने चार ते पाच फूट इतकं पाणी संपूर्ण रस्त्यावर व परिसरात साचले होते. रहिवाशांचे आर्थिक नुकसान झालं. कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक रहिवासी अजीत पाटील यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मढ जेट्टीवर बुडालेली रिकामी स्पीड बोट बाहेर काढण्यात यश
मढ-वर्सोवा जेट्टीवर उभी असलेल्या स्पीड बोटीत जोरदार पावसाने समुद्राचे पाणी भरले. त्यामुळे बोट बुडाली होती. स्थानिक मच्छीमारांनी या बोटीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. बोटीला बाहेर काढण्यात यश आले. बोटीत कोणीही नव्हतं.