मुंबई : जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील आदिवासी पाडे व परिसरातील मुलभूत सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, पदुमचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त राजेंद्र जाधव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना संबंधित विभागांनी तत्काळ मंजूरी द्यावी. भुयारी मार्ग, इंदिरा नगर रेल्वे झोपडपट्टी, रत्नागिरी विहिरींना परवानगी, फोर्स वन हद्दीतील कामे, पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरातील आदिवासी पाड्यांना नागरी सुविधा पुरविणे आदी कामे संबंधित विभागांनी लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच आदिवासी पाड्यांना गावठाणाचा दर्जा देऊन त्यांच्या उपजिवीकेच्या संरक्षणासहित पुनर्वसन करावे.