कोल्हापूर : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात बाहेरून आलेल्या बुरखाधारी टोळक्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काल बाहेरून आलेल्या बुरखाधारी टोळक्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अमानुष हल्ला केला. त्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेची अध्यक्ष आयशी घोष सह अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. देशाच्या संविधानाचा आदर करणारे समतावादी कोल्हापूरचे नागरिक या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
मोठ्या संख्येने असलेल्या गुंडांच्या जमावाने विद्यापीठाच्या आवारात तीन तास दहशत माजवली. त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलीच, पण महिला प्राध्यापकांनाही जबर मारहाण केली. पुरूष आणि महिलांंसाठी असलेल्या वसतिगृहात घुसून त्यांनी तेथे दिसेल त्याला मारहाण करत हैदोस घातला. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला होत असताना कुलगुरूंनी त्याच्याकडे जाणून-बुजून कानाडोळा केला. स्वतः कुलगुरूंनी पोलिसांना पाचारण केलेच नाही. या दहशतवादी हल्ल्याची बातमी वार्यासारखी पसरल्यानंतर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी पोलिसांना कायदा आणि सुरक्षितता पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर कित्येक तासांनी कुलगुरूंनी पोलिसांना हस्तक्षेप करायला सांगितले. जगात नावाजलेल्या विद्यापीठात असे कृत्य करायला गुंडांना मोकळीक दिल्याबद्दल सरकारने या
कुलगुरूंची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. देशाचे राष्ट्रपती या विद्यापीठाचे कुलपती आहेत. त्यांनी कुलगुरूंना या पदावरून हाकलून विद्यापीठाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. या मारहाणीचे व्हिडिओ चित्रण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावरून हा हल्ला पूर्वनियोजित आहे, हे स्पष्ट आहे. या हल्ल्याला चोवीस तास उलटून गेली असली तरीही या गुंडांना अटक झालेली नाही. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांना शासन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ. उदय नारकर, मेघा पानसरे, कॉ. दिलिप पवार, शिवाजीराव परूळेकर, संभाजी जगदाळे, डॉ. सुभाष जाधव, सतिशचंद्र कांबळे, शंकर काटाळे, कृष्णात स्वाती, सिमा पाटील, सुनिता अमृतासागर, रमेश वडणगेकर, रघुनाथ कांबळे, नवनाथ मोरे , पंकज खोत, सर्वेश सवाखंडे, दिलदार मुजावर, हरिष कांबळे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, रत्नदिप सरोदे, महादेव शिंगे, अनमोल कोठाडिया आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.