
तरुणांनाही लाजवेल असे चिरतरुण आणि स्वास्थ्य लाभलेले हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार जितेंद्र लवकरच ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अभिनय आणि खास नृत्यशैलीच्या जोरावर प्रसिद्ध झालेल्या जितेंद्र यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. या चाहत्यांसाठी जितेंद्र यांच्या खास ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेलिब्रेटिंग जितेंद्र’ हा मेगा म्युजीकल शो होणार आहे. मुंबईस्थित स्वयम् दिप सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने हा कार्यक्रम १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता षण्मुखानंद सभागृहात घेतला आहे. कार्यक्रमामागे स्वयम् दिप अध्यक्ष डॉ. भावनाराज यांची संकल्पनाआहे. ‘सेलिब्रेटिंग जितेंद्र’ या कार्यक्रमात खुद्द जितेंद्र उपस्थित राहणार असल्यामुळे, ‘हिम्मतवाला’च्या चाहत्यांसाठी हा शो मोठी पर्वणीच ठरणार आहे.
जितेंद्र यांची अभिनय कारकीर्द आजच्या तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या जितेंद्र यांना हिदी चित्रपटसृष्टीतले हे यश टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. एकवेळ त्यांची कारकीर्द संपुष्टात आली असे वाटत असतानाच हिम्मतवाला, खुदगर्ज या सारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरवात केली. अथक परिश्रम आणि अत्माविश्वाच्या जोरावर जितेंद्र यांनी यशाची पुन्हा पुन्हा मुसंडी मारली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव ‘सेलिब्रेटिंग जितेंद्र’ या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची संध्याकाळ श्रोत्यांसाठी म्युजीकल ठरणार आहे. अनेक होतकरू गायकांद्वारे जितेंद्र यांची गाजलेली गाणी कार्यक्रमात सादर केली जाणार असून, त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न देखील यात केला जाईल. जितेंद्र यांच्या कन्या एकता कपूर, मुलगा तुषार कपूर यांची देखील या कार्यक्रमात उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक शान आणि बॉलीवूडच्या अन्य कलाकारांची देखील यात वर्णी लागणार आहे.
बुक माय शोवर बुकिंग करा
जितेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय बुकमाय शो या संकेतस्थळाद्वारे ई – तिकीटाची देखील सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सेलिब्रेटिंग जितेंद्र’ या शोद्वारे जमा झालेली नकद निधीच्या रुपात सामाजिक कार्यात वापरण्यात येणार आहे.















