रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जयगड येथील जिंदल कंपनी विरोधात छेडण्यात आलेले उपोषणावर सहाव्या दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे निर्णय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनी विरोधात येथील प्रशांत फटकरे, वैभव घडशी, अक्षय मेणे आणि सचिन घडशी या चौघा तरूणांनी स्वातंत्र्यदिनापासून आमरण उपोषण छेडले आहे. कुलिंग टॉवर मधून बाहेर पडणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे कुणबीवाडी, नांदिवडे परिसरातील ग्रामस्थांच्या डिश टिव्ही अँटेना, विद्युत जोडणीच्या जीआय तारा गंजुन खराब झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या बदलुन देणे आवश्यक असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. अशा बारा मागण्यांबाबत कंपनीने आश्वासन देऊनही कोणतीच कार्यवाही न केल्याने १५ आॅगस्टपासून आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. सहाव्या दिवशी आमरण उपोषणाला बसलेल्या चौघा तरूणांपैकी अक्षय मेणे याची
प्रकृति सोमवारी सकाळी अत्यंत चिंताजन बनली. सोमवारी सकाळी वैद्यकिय तपासणीनंतर अक्षय मेणे याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित तिघांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. उपोषणाच्या पहील्या दिवशी केवळ तहसिलदार सुकटे यांनी उपोषणकर्त्यांची धावती भेट घेतली. यानंतर उपोषणाच्या सहाव्या दिवसापर्यंत प्रशासन आणि कंपनी यांच्याकडून उपोषण सुटावे यासाठी कोणतहीच मध्यस्थी करण्यात आलेली नाही.