रत्नागिरी, विशेष प्रतिनिधी:- वर्षानुवर्षे प्रलंबित आणि दुर्लक्षित राहिलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिंदाल कंपनीविरोधात जयगडमधील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला असून २१ डिसेंबरला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने कंपनीच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. जयगड येथील सत्यविजय खाडे यांच्या गेटसमोरील जागेत ग्रामस्थ 21 डिसेंबरला सकाळपासून बेमुदत उपोषण करणार आहेत.
ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, जिंदाल कंपनीने स्थानिकांऐवजी परजिल्ह्यातील युवकांना नोकरीत संधी दिली आहे. कंपनीच्या प्रदूषणामुळे जयगड पंचक्रोशीतल आंबा, काजू, बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जेएसडब्ल्यू पोर्ट, जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपनीच्या व्यवस्थापनाने आजपर्यंत एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही असे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत.
तसेच निवेदनात म्हणण्यात आलं आहे की,
जिंदाल कंपनीच्या कुलिंग टॉवरमधून बाहेर पडणार्या पाण्यामुळे पंचक्रोशीचे नुकसान होत आहे. राख उडून आंबा, काजू कलमांवरील फळधारणेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक घरांवर राख साचून भांडीकुंडी काळी पडली आहेत.
कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची वारंवार दुरवस्था होत आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते धोकादायक बनले आहेत. धामणखोल बंदरात यापूर्वी कायमस्वरूपी मासे मिळत होते. कंपनीतून खाडीत सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे मासे मिळणे बंद झाले आहे. मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार हे सर्व प्रश्न कंपनीपुढे मांडूनही काहीच प्रतिसाद मिळत नाही. आमच्या या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे जयगड ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. बेमुदत उपोषणाचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्क यांनाही जयगड ग्रामस्थांनी दिले आहे.