
रत्नागिरी : जयगडमधील जिंदाल पोर्टने मच्छिमारांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले असून कंपनी विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांना देण्यात आलं. यावेळी विवेक सुर्वे, सलील मिरकर, तबरेज सोलकर, बशीर होडेकर, मुश्ताक टेमकर, गुलाम सैवडेकर, करीम जांभारकर आदी उपस्थित होते.
जिंदाल पोर्टच्या वाढीव ब्रेकवॉटर वाँलच्या बांधकामाला परिसरातील मच्छिमारांनी विरोध दर्शवून उपोषणाचा इशारा दिला होता, त्यावेळी झालेल्या तडजोडीनुसार कंपनीने आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या असं मच्छिमारांचं म्हणणं आहे. मात्र आजतागायत या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.. कंपनीकडे वारंवार लेखी व तोंडी पत्रव्यवहार करूनही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे नाईलाजाने जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला कंपनीच्या गेटजवळ बेमुदत उपोषण छेडावं लागत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचं निर्धार मच्छिमारांनी केला आहे.
18 एप्रिल 2014 रोजी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या सभेत ठरल्याप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता कंपनीने करावी. 2014 पासूनची सर्व नुकसान भरपाई मच्छिमारांना त्वरित द्यावी. कंपनीने गरम पाणी खोल समुद्रात सोडावं. जिंदाल एनर्जीतून उडणाऱ्या राखेचा त्वरित बंदोबस्त करावा. जयगड खाडी किनारी धुपप्रतिबंधक बंधारा ताबडतोब बांधून द्यावा. अशा जवळपास 14 मागण्या मच्छिमारांच्या आहेत. याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.















