रत्नागिरी, प्रतिनिधी: देशात भोंदू बाबांकडून शोषण केले जात असल्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत. राम रहीम नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कृष्णा पाटील या भोंदू बाबाचे किस्से समोर आले. रत्नागिरी जिल्यातील अशाच प्रकारच्या सर्व भोंदूबाबांची यादी मी पोलिसांकडे देणार आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केले. बुवाबाजी विरोधी संघर्ष सभा आज रत्नागिरीतल्या केतन मंगल कार्यालयामध्ये पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रत्नागिरीतला भोंदू श्रीकृष्ण पाटील उर्फ पाटील बुवाला पोलिसांनी बेड्या घातल्यानंतर त्याचे अनेक किस्से समोर येत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे प्रकरण उचलून धरले आहे. दरम्यान अंनिसच्या दाभोलकर यांनी येथील पीडित महिलांची भेट घेतली. पिडित महिलांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचेही दाभोळकर यांनी स्पष्ट केले. झरेवाडीतला मठ कायमचा बंद करण्यासाठी मोठा लढा उभारू, पोलिसांनी बुवाच्या अन्य साथीदारांना लवकर अटक करावी, या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.