गौरीच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत
रत्नागिरी, प्रतिनिधी
गणेशोत्सवात महिला वर्ग जिची आतुरतेने वाट बघत असतो त्या गौरीमातेचं आज जिल्ह्यात ठिकठिकाणी वाजतगाजत आगमन करण्यात आलं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ५४ हजार ५०६ गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोकणात महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात… पाणवठ्यावरुन गौरीच्या मुखवट्याची गौरी घरी आणण्याची परंपरा आहे…..कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत’ गवर असेही संबोधले जाते … गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी गुणगुणत तसेच महिलावर्ग नाच गाणी करतात… आज गौरीचं आगमन घराघरात झालं… गौरी आगमनाबरोबर गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधाना करण्याची परंपरा पहायला मिळते. गणराया पाठोपाठ आज झालेल्या गौरीच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
जिल्ह्यात विशेषत ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईच आगमन होतं. गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी ताम्हनात घरी आणल्या जातात. या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात. गौरीचा मुखवटा धरुन तो पाणवठ्यावरुन घरापर्यत सुहासीनी घेवून येतात. घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचं धुमधडाक्यात स्वागत होतं. आणि गौरी आगमनानं गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते.
कोकणात गौरीचे अनेक प्रकार पहायला मिळतात…कुठे साधी तेरड्याची…कुठे कागदी मुखवटा लावून टोपलीत बसलेली तर कुठे पूर्णाकृती गवार तर कुठे खुर्चीवर बसलेल्या अवस्थेतील गौरी सजवली जाते… कोकणातील अनेक गावातील घरामध्ये लाकडाच्या पूर्णाकृती गौरी असतात…. दरवर्षी या गौरी ना नव्या वस्त्रालंकारानी सजवले जाते…. अनेक घरामध्ये गौरीचे वर्षानुवर्षाचे ख-या सोन्याचे दागिने ही असतात..
कोकणात आज गौरीसाठी गोड नैवेद्य केला जातो तर उद्या कोकणात सर्वत्र तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो. आज गौराईचे आगमन व् उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे.