रत्नागिरी दि.18:- चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्स हरियाणा- 2022 करीता महाराष्ट्र राज्याचा संघ निश्चित करावयाचा आहे, त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा व निवड चाचणीकरीता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा. संघप्रवेशिका तसेच निवड चाचणीची नोंदणी ratnagiridso@gmail.com या ईमेल आयडी वर 22 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत करावी.
सदर जिल्हास्तर स्पर्धा खो-खो १८ वर्षाखालील मुले/ मुली, कबड्डी १८ वर्षाआतील मुले (७० किलो व त्याखालील) /मुली (६५किलो व त्याखालील) व बास्केटबॉल १८ वर्षाआतील मुली या वयोगटात होणार आहेत. स्पर्धेकरीता सहभागी होणारा खेळाडू हा ०१ जानेवारी २००३ रोजी व त्यानंतर जन्मलेला असावा. खेळाडूकडे आधार कार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी बोर्ड सर्टीफिकेट), जन्म प्रमाणपत्र यापैकी दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. जिल्हस्तरीय स्पर्धेकरीता शाळा/ क्लब यांच्या संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होऊ न शकणा-या खेळाडूंना निवड चाचणी करीता संधी मिळेल. स्पर्धेचे आयोजन त्या- त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नियमानुसार व जिल्हा संघटनेच्या सहकार्याने होणार आहेत. जिल्हा व विभागीय स्पर्धेतील विजयी संघ व हारलेल्या संघातील उत्कृष्ट खेळाडू व निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूंमधुन ५ खेळाडूंची निवड पुढीलस्तरासाठी होईल. सदर स्पर्धा/ निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडीया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्याकरीता करण्यात येत असल्याने सहभागी खेळाडूंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
जिल्हास्तर खेलो इंडीया १८ वर्षाखालील मुली बास्केटबॉल स्पर्धा २३ नोव्हेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे सकाळी १०.०० वाजता व निवड चाचणी सांघिक सामने संपल्यानंतर लगेच स्पर्धा स्थळी आयोजित होणार आहे.जिल्हास्तर खेलो इंडीया १८ वर्षाखालील मुले/ मुली खो-खो स्पर्धा २४ नोव्हेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे सकाळी ९.०० वाजता व निवड चाचणी सांघिक सामने संपल्यानंतर लगेच स्पर्धा स्थळी आयोजित होणार आहे.जिल्हास्तर खेलो इंडीया १८ वर्षाखालील मुले/ मुली कबड्डी स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी एस.व्ही.जे.सी.टी चे क्रीडा संकुल,डेरवण,सावर्डे,ता.चिपळूण येथे सकाळी ९.०० वाजता आयोजित केल्या आहेत व निवड चाचणी दुपारी २.०० वाजता स्पर्धा स्थळी आयोजित होणार आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.














