रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांनी रात्री रुग्णालयात धिंगाणा घातला. कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या महिलेला विलगीकरण कक्षात जाण्यास सांगीतले म्हणून तसेच रिपोर्ट खोटे बनवले असल्याचा कांगावा करत हंगामा केला. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेले रुग्ण कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावून गेले. तर कोरोनाबाधीत महिलेने आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं या वार्डमध्ये ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा आता पाचवर गेला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात कोरोेनाबाधित रूग्ण आणि संशयित नातेवाईकांनी थेट जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकी देत अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसा आरोप जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर नर्स, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनी आक्रमक भूमिका घेत या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धमकीचा सारा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे यांच्या कानावर घातल्यानंतर देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी ऑन ड्युटी असणारे कर्मचारी अरूण डांगे यांनी केला आहे.
साखरतर येथील कोरोनाबाधित महिला रूग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. यांचे रिपोर्ट हे गुरूवारी रात्री आले. यातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या कोरोनाबाधित महिला रूग्णाला वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करावे लागेल अशी माहिती संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी या संशियत रुग्णांनी व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाने हंगामा केला. तुम्ही हे रिपोर्ट खोटे बनवून आणले असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले.. आम्ही तुम्हाला बघून घेऊ. उद्या सकाळी तुम्ही सगळे कुठे असाल हे तुम्हाला कळणार नाही अशी धमकी कोरोनाबाधितच्या नातेवाईकांनी दिल्याचा आरोप जिल्हा रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच एका नातेवाईकाने भिंतीवरील ट्युबलाईट काढून अंगावर धावून आला, अशी माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे. हे सर्व प्रकरण आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनवरून सांगितलं, त्यांनीही फोन वरून सूचना केल्या. मात्र कोणी अधिकारी इथं आला नाही अशी तक्रार या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे.