रत्नागिरी (आरकेजी) : जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली असून रुग्णांना सोयी- सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलनाच हत्यार उपसले आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर आघाडीने जोरदार आंदोलन केले.
रत्नागिरीचे जिल्हा रुग्णालय हे अद्ययावत असलं तरी अनेक सोई-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने आक्रमक होत आज जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं. जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल महाविद्यालय सुरु करावं, रिक्त असलेल्या तद्न्य डॉक्टरांची पदं लवकरात लवकर भरण्यात यावीत. गेले अनेक वर्ष बंद असलेलं सिटी स्कॅन मशीन सुरु करावं, दिव्यांगांना अपंगत्वाचे दाखले रोजच्या रोज मिळण्याची व्यवस्था करावी. रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग प्रत्येक दिवशी चालू झालाच पाहिजे. एमआरआय सुविधा त्वरित उपलब्ध करावी. कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत रुजू करून ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी. रुग्णालयातील स्वच्छतागृह दुरुस्त करून त्यांची नियमित स्वच्छता करावी. आदी अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलाहि या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.