
मुंबई, दि.१९ (विनिशा धामणकर) : कुलाबा येथील कफ परेडच्या मच्छिमार नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश मोहिते(सोनू) या २९ वर्षीय गरीब, होतकरू चित्रकाराचं चित्रप्रदर्शन थेट मुंबईतील जगप्रसिद्ध अशा ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत होत आहे.आणि विशेष म्हणजे टाटा समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे.२४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे.
निलेश मोहिते केवळ ९वी पर्यंत शिकला आहे. वडिलांच्या पाठींब्याअभावी आईनेच चार घरची धुणीभांडी करून निलेश आणि त्याच्या बहिणीचं पालनपोषण केलं. मात्र आईला ही कामं करावी लागू नयेत म्हणून निलेशने रात्रशाळेसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी करून आपला चित्रकलेचा छंदही जोपासला. त्यातूनच त्याची चित्रं विकली जाऊ शकतात आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू शकतो याची जाणीव त्याला झाली.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे निलेशचे आदर्श. त्यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभर तो ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा. अखेर एक दिवस रतन टाटा यांनी त्याला पाहिलं आणि बोलावून घेतलं. रतन टाटा यांचं विमानात चढतानाचं एक चित्र रतन टाटा यांना भेट म्हणून दिलं. या तरुणाची कला पाहून टाटा प्रभावित झाले. त्याच्याशी बोलताना त्याची बिकट परिस्थिती रतन टाटा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मोठ्या रकमेचा चेक देऊ केला आणि ‘या पैशातून मोठं घर घे,’ असं म्हणाले. पण भेटवस्तू म्हणून दिलेल्या चित्राचे पैसे घेणं निलेशला मान्य नव्हतं म्हणून निलेशने तो चेक नम्रपणे नाकारला. त्याची नम्रता पाहून रतन टाटांनी त्याला विचारलं की, ‘मग तुझ्यासाठी मी काय करू शकतो?’ त्यावर निलेशने चित्रप्रदर्शनासाठी जागा देण्याची आणि तुम्ही त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मागणी केली. अर्थात ती मागणी लगेच मान्य झाली… आणि आज निलेश मोहितेच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईमधील कुलाब्याच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या गॅलरीत पार पडत आहे.
अर्थात हा प्रवास एवढा सोपा नव्हता. या कठीण काळात निलेशला भेटल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर. ज्योतीताईंनी सर्वात प्रथम त्याचा आत्मविशास वाढवला. लोकांशी संपर्क कसा करावा, त्यांच्याशी संवाद कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रदर्शनाची निश्चिती झाल्यावर चित्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेणं हे निलेश समोर एक मोठं आव्हान होतं. पण ह्या संपूर्ण खर्चाची तजवीज त्याची प्रेरणास्थान असलेल्या ज्योतीताईंनी करून दिली आणि संपूर्ण लक्ष चित्रांकडे दे असं सांगितलं. यासोबत निलेशच्या आई लता मोहिते यांचं खंबीर पाठबळ त्याला होतंच. शिवाय उद्योगपती मर्जी पारख यांनीही अमूल्य मदत केली. या सर्वांच्या अनमोल मदतीमुळे निलेश आपली चित्रे कॅनव्हासवर उतरवू शकला.
झोपडपट्टीतील लाजराबुजरा, कमी शिकलेला, चित्रकलेचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेला परंतु उच्च प्रतिभेची नैसर्गिक देणगी लाभलेला तरुण आज मुंबईमधील कुलाबा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपले चित्रं प्रदर्शन भरवत आहे. अनेक उद्योगपती आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.















