मुंबई : चेंबूर येथे पावसाळ्यात नारळाचे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांनी या घटनेची चेंबूरमध्ये पुनरावृत्ती झाली असून यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर महिला चेंबूर येथील चिंतामणी गार्डन येथे सकाळी बसची वाट पहात बाजूच्या बाकावर बसली होती. दरम्यान ही दुर्घटना झाली.
शारदा सहदेव घोडेस्वार (४५) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.सदर महिला आज सकाळी कामावर जाण्यासाठी साडेदहाच्या सुमारास बसची वाट पहात बसस्टॉपवर उभी होती. त्याचवेळी बाजूलाच असलेले भलेमोठे गुलमोहराचे झाड तिच्या अंगावर कोसळले. या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. सदर महिला पती व ३ मुलांसह पांजरपोळ येथे रहात होती. तिचा पती काही कामधंदा करत नसल्याने ती काम करून संसाराचा गाडा हाकत होती. त्यामुळे तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत झाड कोसळुन मृत्यू वा जखमी झाल्यास त्यांना पालिकेकडून आर्थिक मदत दिली जाते. याच नियमानुसार पालिका शारदा घोडेस्वार यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.