मुंबई : जेट एअरवेज या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने उत्तम प्रवासासाठी उबेरबरोबर भागीदारी केली आहे. प्रवाशांना सेवा देण्यासाठी भारतीय विमान क्षेत्रातील हा पहिलाच करार आहे. विमानतळावर ये-जा करण्यासाठी अधिक पर्याय असावेत, म्हणून कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जेट एअरवेजच्या अॅपवरून तिकीट आरक्षित केले की ही सेवा दिली जाईल. जेट एअरवेज आणि उबेर या दोन्ही प्रवास क्षेत्रातील कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अॅपवरून तिकीट आरक्षित केल्यावर, जेट-उबेर हा प्रोमोकोड वापरून प्रवास आरक्षित केल्यास पहिल्या तीन राइडसाठी १५० रुपयांची सवलत, पहिल्यांदा उबेर वापरणाऱ्यांनाही प्राप्त होणार आहे.
जेट एअरवेजचे मुख्य वाणिज्य अधिकारी जयराज षणमुगम म्हणाले की, “प्रवाशांना त्यांचे घर किंवा कार्यालयापासून विमानतळावर अगदी सुलभपणे नेणे आणणे, यासाठी आम्ही ही भागीदारी केली आहे, यामुळे तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आमच्या ग्राहकांच्या अनुभवात वाढ व्हावी हेच आमचे ध्येय आहे. ”
उबेर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी मधु कन्नन म्हणाले की, “जेट एअरवेजबरोबर भागीदारी करताना आम्ही अतिशय उत्सुक आहोत, यामुळे जेट एअरवेजचा भारतातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या भागीदारीच्या साहाय्याने जेटएअरवेजच्या प्रवाशांना २९ शहरांतून विमान तिकीट आरक्षित करता येईल. यामुळे प्रवासासाठी विमानतळावरजाताना अखेरच्या क्षणी होणारी गडबड टळणार आहे. शहरातील हव्या त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे पोहोचता येणार आहे.”
भारतात उबेरची सेवा असेल अशा सर्व शहरांमध्ये, कॅब आरक्षित करण्याचे हे वैशिष्ट्यं जेट एअरवेजच्या पाहुण्यांसाठी उपलब्ध करूनदेण्यात येणार आहे, जेट एअरवेजच्या अॅपद्वारे हे आरक्षण करतानाच कॅब आरक्षित करायची आहे.