मुंबई : मुंबईसह राज्यातील दुर्गम भागात मोटर बाईक ॲम्बुलन्सला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईत वृद्धांच्या सुश्रुषेसाठी सायकल ॲम्बुलन्स प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असून विलेपार्ले पूर्व व शिवाजी पार्क या भागाची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या बाबींवर काम सुरु असून लवकरच मुंबईत सायकल ॲम्बुलन्स धावताना दिसेल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.मुंबईत वर्षभरापूर्वी 10 बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने या सेवेचा विस्तार करीत नव्याने 10 बाईक ॲम्बुलन्स मुंबई शहरात यावर्षी सुरु करण्यात आल्या. त्याचबरोबर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली येथे ही सेवा सुरु करण्यात आली. पालघर व मेळघाट येथे प्रत्येकी पाच तर गडचिरोली येथे एका बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. मुंबईत सुमारे तीन हजार पेक्षा जास्त तर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली येथे साधारणत: 300 पेक्षा अधिक रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून जीवदान मिळाले आहे.बाईक ॲम्बुलन्सची उपयुक्तता लक्षात घेता राज्यात पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर या महानगरांमध्येही चिंचोळ्या रस्त्यांतून वाट काढण्यासाठी ही सेवा सुरु करण्याचे शासनाचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.याच धर्तीवर मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या (जेरियाट्रिक) सुश्रुषेसाठी सायकल ॲम्बुलन्स ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृद्धांना वाढत्या वयात अनेक शारीरिक समस्या भेडसावतात. अशा वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची तपासणी, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात आहे की नाही याची तपासणी पॅरामेडिकलच्या माध्यमातून करण्यासाठी सायकल ॲम्बुलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे. मुंबईत विलेपार्ले पूर्व आणि शिवाजी पार्क या भागाची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली असून तेथे ही सेवा सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. या दोन्ही भागात प्रत्येकी 25 सायकल देऊन पॅरामेडिकलच्या माध्यमातून वृद्धांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.बाईक ॲम्बुलन्सच्या रचनेप्रमाणेच सायकल ॲम्बुलन्सची रचना असून प्रशिक्षित पॅरामेडिकल या ॲम्बुलन्सचा चालक असणार आहे. या सेवेसाठी एक बेस स्टेशन करण्यात येणार असून तेथून ज्येष्ठांशी संवाद साधला जाईल. या सर्व बाबींवर तांत्रिकदृष्ट्या कार्यवाही सुरु असून लवकरच हा विशेष प्रकल्प मुंबईत सुरु होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.