मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : जनता दल युनायटेड या पक्षाने महाराष्ट्रात २०१९ साली होणार्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज जनता दल युनायटेड महाराष्ट्र प्रदेशने गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडमध्ये संमेलन घेतले. पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यादव यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
बिहारमधील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्याने या राज्यात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसल्याची माहिती नितीश यांनी दिली. बिहार राज्यात कृषि क्षेत्रात प्रगती होत आहे. तेथे दारुबंदीचा निर्णय घेतला आणि राज्याचा प्रमुख म्हणून प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मद्याची दुकाने बंद करण्याचा जो निर्णय दिला त्याचे नितीश यांनी स्वागत केले. परंतु, महाराष्ट्र सरकार या उलट वागत आहे. राज्याचा महसूल बूड़णार असल्याने दारू बंदी उठवण्याच्या निर्णय घेत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी नितीश यांनी आमदार कपिल पाटील यांना महाराष्ट्र जनता दल यूनायटेड पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच शशांक राव यांची मुंबई अध्यक्ष पदी निवड केल्याची घोषणा केली. महाराष्ट्रात जनता दल यूनायटेड या पक्षाच्या विस्तारासाठी कार्य करणार असल्याचे पाटील म्हणाले. बिहारमधील अनेक महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. कपिल पाटील आणि शशांक राव यांनी मेळाव्याचे संयोजन केले होते.