मुंबई : चीनसह जगभरातील गुंतवणूकदार भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. पर्यटनासह डिफेन्स, हॉस्पिटॅलिटी उद्योगाला इथे मोठा वाव असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
लक्झेंबर्गचे राजदूत जीन क्लाउड क्यूगनर आणि कौन्सिल जनरल पार्सेस बोलीमोरिया यांनी आज मंत्री श्री. रावल यांची मंत्रालयात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यावेळी उपस्थित होते.
मुंबई – गोवा आंगरीया क्रूझ सेवा सुरू झाल्याने महाराष्ट्रात पर्यटन उद्योगात गुंतवणुकीचे नवे दालन खुले झाले आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांमुळे क्रूझ, थीम पार्क, वॉटर स्पोर्ट उद्योगात मोठी संधी आहे. पुणे आयटी हब, नाशिक वाइन टुरिझम,ताडोबा टायगर सफारीसाठी जगद्विख्यात झाले आहे. संरक्षण उत्पादन निर्मिती, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातही गुंतवणूकीस महाराष्ट्रात मोठा वाव आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची संख्या वाढू लागली आहे. लक्झेंबर्गनेही महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी यावेळी केले.
रामायण हा भारत आणि श्रीलंकेला जोडणारा दुवा
रामायण हा भारत आणि श्रीलंकेला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. अयोध्या ते श्रीलंका हा पर्यटन कॉरिडॉर निर्माण करण्याची गरज असल्याचे मत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.
श्रीलंकेच्या कौन्सिल जनरल चामरी रॉड्रिगो यांनी सोमवारी मंत्रालयात श्री. रावल यांची भेट घेऊन दोन्ही देशात पर्यटन वाढीसाठी करावयाच्या उपक्रमांबद्दल चर्चा केली. यावेळी मंत्री श्री. रावल यांनी हा प्रस्ताव मांडला. दोन्ही देशात मेडिकल टुरिझम,धार्मिक टुरिझम, वाईल्ड लाईफ टुरिझम वाढवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.