रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी तालुक्यातील प्रस्तावित जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सरकारविरोधात मोर्चा काढत ग्रामस्थानी कोकण रेल्वे आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक हेही या मोर्चात सहभागी झाले होते.
जयगड येथील जिंदाल प्रकल्पाचे बंदर आणि कोकण रेल्वेचा मुख्य मार्ग यांना जोडणाऱ्या 36 किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्रयांच्या हस्ते करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, याला किती दराने मोबदला मिळणार आणि तो कधी मिळणार याचा कोणताच खुलासा सरकारने न करताच काम सुरु केल्याने आज डिंगणीच्या खाडेवाडीतल्या ग्रामस्थानी सरकार विरोधातला आपला निषेध नोंदवला. याच खाडेवाडीत या प्रकल्पाचं मुख्य स्थानक उभारलं जाणार आहे. या स्थानकाकरिता शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी घेतल्या जात असून कोकण रेल्वेने शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण केलं असल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला. याच गावातील शेतकऱ्यांनी कोकण रेल्वे साठी जमिनी दिल्या होत्या, त्यावेळी तरुण पिढीला रोजगाराचं दिलेलं आश्वासन आज 20 वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत, सरकारने आमच्यावर जबरदस्ती करू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण बंदर जोड प्रकल्पामुळे या खाडेवाडी परिसरात भूस्खलनातून 150 घरांना धोका असल्याने या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचं ग्रामस्थानी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याची भूमिका यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्पष्ट केली.