
रत्नागिरी : सध्या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र ९० टक्के संस्था धंदा म्हणूनच संस्था चालवित आहेत. येथे गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. महाराष्ट्रातील शिक्षण पध्दती बदलणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. डॉ.नानासाहेब मयेकर ग्रमीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी डॉ.मयेकर यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून संस्था उभी केली. महाराष्ट्रातील कुणीहि त्याची दखल घेतली नसली तरीहि कॉमनवेल्थ व्हाेकेशनल युनिर्व्हसिटी किंगडम ऑफ टोंगा या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही मानद पदवी देऊन रत्नागिरीचा गौरव केला आहे. पदवी मिळाल्याने डॉ.मयेकर यांची जबाबदारी वाढली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी आपल्याला आवश्यक ती मदत सदैव करेन, असे प्रितपादन रायगडचे शेकाप आमदार जयंत पाटील केले. मालगुंड दशक्रोशीच्यावतीने डॉ.नाना मयेकर यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.पाटील बोलत होते. यावेळी आमदार हुस्नबानू खलिफे, दै.रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर, माजी शिक्षण सभापती शरद बोरकर, राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम, कुमार शेट्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.नाना मयेकर यांच्या कुटुंबियांना सामाजिक सेवेचा वारसा आहे. त्यांच्या वडीलांनी शिक्षण संस्था उभी केली. ती परंपरा नानांनी जपली आहे. मालगुंड एज्युकेशन सोसायटीत ज्या सुविधा देणे शक्य नाही त्यासाठी चाफे येथे नवे महाविद्यालय उभारले. आयटीआय सुरू केला. ग्रमीण भागातील मुलांचे प्राथमिक शिक्षणानंतर मिळणारे शिक्षण बंद होणार होते. ते डॉ.मयेकर यांच्यामुळे त्यांना घेणे शक्य झाले. ग्रमीण भागात शिक्षणाची चळवळ उभी केल्यामुळे त्याचा फायदा अनेक गरजू रूग्णांना झाला. यामुळे नानांना परदेशातील विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली आहे. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या पातळीप्रमाणे तुम्ही काम करा. एमबीए, पर्यटनात करिअर होणारे अभ्यासक्रम सुरू करून शिक्षण क्षेत्रातील नाविण्य आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून द्या, असे आ.पाटील यांनी सांगितले. मयेकर कुटुंबियांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे. हा मालगुंडवासियांचा गौरव आहे. यापुढेहि असेच काम करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहचवा, असे श्री.उल्हासराव घोसाळकर यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना डॉ.नाना मयेकर यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानत जबाबदारी वाढली असून त्याप्रमाणे यापुढील काळात काम करू, असे सांगितले.















