मुंबई, (प्रशांत बढे) : ई-कचर्यातून अत्याधुनिक संगणकाची निर्मिती करता येते; हे दहावीच्या जयंत परब या विद्यार्थ्याने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्याने अवघ्या अडीच हजार रुपयांत नऊ इंचाचा मिनी संगणक बनविला आहे. नऊ इंच स्क्रीन, एक जीबी रॅम, ८० जीबी हार्ड डिस्क, ड्युल कोर प्रोसेसर, ब्लु टूथ, वायफाय अशा सुविधा या संगणकात जयंतने दिल्या आहेत. जयंतच्या या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
घाटकोपरच्या असल्फा विभागात जयंत परब कुटुंबासह राहतो. त्याने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली आहे. असल्फातच श्री गणेश कम्पुटर हे त्याच्या वडिलांचे संगणक दुरुस्तीचे दुकान आहे. दुकानाला लागूनच त्यांचे घर आहे. जयंतला संगणक बनविण्याची संकल्पना त्याच्या शाळेत भरविण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रयोग स्पर्धेतून मिळाली. परेरावाडीतील तेरेजा हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याला ई-वेस्ट पासून काही उपयोगी वस्तू बनविण्याठीचा प्रयोग सादर करण्यास सांगण्यात आले होते. यास्पर्धेमुळेच त्याने ई- वेस्ट सारख्या गंभीर समस्येवर अभ्यास केला. वडिलांचे संगणक दुरुस्तीचा व्यवसाय असल्याने संगणकाचे भाग आणि खराब झालेले संगणक यांचा ई कचरा यातून त्याला छोटासा संगणक तयार करण्याची कल्पना सुचली.
त्याने भंगारातील संगणकांचे विविध भाग एकत्रित केले आणि मिनी संगणक तयार केला आहे. या संगणकाच्या स्क्रीनलाच त्याचा छोटासा सिपीयू जोडलेला आहे. फक्त कि पॅड आणि माऊस वेगळा आहे. नव्या संगणकासारखीच या संगणकाची निर्मिती आहे. अवघ्या अडीच हजार रुपयात त्याची निर्मिती झाली आहे. पाच हजार रुपयापर्यंत तो ग्राहकांना मिळू शकेल.
“ई-वेस्ट ही गंभीर समस्या आहे. जर असे अतिशय कमी किमतीचे संगणक तयार केल्यास ई-वेस्ट थोड्याफार प्रमाणात तोडगा निघेल. गरीब आणि गरजूंना अतिशय कमी किमतीत संगणक उपलब्ध करून देता येईल,” असे जयंत म्हणाला. भविष्यात ई- वेस्ट वर जास्तीत जास्त काम करायचे आहे. अतिशय कमी दरात संगणक कसे उपलब्ध होतील, यावर त्याचा भर देणार असल्याचे त्याने सांगितले.