पिंपरी-चिंचवड/मुंबई, १९ June : विराज जगताप या तरुणाच्या खून प्रकरणाला जातीय वळण देऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर गृहमंत्री अनिल देशमुख ही नतमस्तक झाले. संपूर्ण गावाला सोबत घेऊन त्यांनी जातीय वाद टाळण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप या तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जाऊ लागले होते. यामुळे माजी नगरसेवक असलेल्या विराजच्या आजी सुभद्राबाई जगताप पुढे आल्या. “वैयक्तिक दु:ख विसरून जातीय सौहार्द राखण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांच्याकडून सर्वांनी हे शिकण्यासारखं आहे.” जगताप कुटुंबाचे सांत्वन करताना शासकीय नियमानुसार सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा पहिला भाग – ₹ ४.१२ लाखाचा धनादेश गृहमंत्र्यांनी विराजच्या आई रेश्मा यांना दिला. गृहमंत्री म्हणाले, “या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, विराजच्या कुटुंबियांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. सुभद्राबाईंनी समोर येऊन संपूर्ण गावाशी संवाद साधला. सर्व गावाची एकत्र बैठक घेतली. माझा नातू गेला आहे तो काही परत येणार नाही, परंतु तुम्ही वाईट पोस्ट करू नका, यातील दोन जातीमध्ये वाद निर्माण होईल, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले नाही. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी संयम दाखविला,” असं सांगून ते म्हणाले, “महाराष्ट्राची हिच ताकद आहे. कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना इथे थारा मिळत नाही. हेच जगताप कुटुंबियांनी अधोरेखित केले आहे.