
विराज जगतापची ऑनर किलिंग, अरविंद बनसोडे यांची हत्या व एकाच आदिवासी कुटुंबातील तिघांची हत्या या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवण्याची मागणी
मुंबई, 12 जून : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने आज १२ जून रोजी राज्यभर आंदोलन करून वाढत्या जातीय अत्याचाराचा तीव्र निषेध केला. जातीय अत्याचारासारख्या घटनांच्या निषेधार्थ आणि दोषींवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी एसएफआयने हे आंदोलन केले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात एसएफआयच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी आपल्या घरातूनच यात सहभाग घेऊन निषेध नोंदवला.
काही आठवड्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांगवडगाव येथे एकाच आदिवासी कुटुंबातील तिघा जणांना ठार मारण्यात आले. काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात नारखेड येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांना जीवे मारले गेले. आणि आता चार दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे विराज जगतापची ऑनर किलिंग झाली. या घटनांचा एसएफआय तीव्र धिक्कार करते आणि अशा अत्याचाराच्या विरोधात राज्यातील विद्यार्थी व जनतेने एकत्र येऊन लढण्याचे आवाहन करत आजचे हे निषेध आंदोलन करण्यात आले.
या घटना अत्यंत भयंकर असून पुरोगामी महाराष्ट्राला सतत कलंकित करणाऱ्या आहेत. अशा घटना राज्यात पुन्हा पुन्हा होत आहेत. आतापर्यंत अनेक घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे. तरी देखील आजवर अशा घटना थांबविण्यात सरकार सपशेल फेल ठरलेले आहे. परंतु या घटनांना पायबंद करणे शक्य आहे. त्यासाठी सरकारने कडक कारवाई आणि अशा घटना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचे तंतोतंत अंमल केले पाहिजे. असे मत एसएफआयने व्यक्त केले.
जातीय अत्याचाराच्या विरोधात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आज एकजूट दाखवून मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केले. या आंदोलनातून एसएफआय पुढील मागण्या केल्या आहेत. १) सदरील सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवावेत. २) कायद्यातील तरतुदी नुसार अत्याचारग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य आणि अन्य मदत देण्यात यावी. ३) राज्यात वाढत चाललेल्या जातीय अत्याचाराला आळा घाला. अशा ठिकाणी आवश्यक उपाय योजना राबवा.
एसएफआयच्या या आंदोलनात राज्यातील मुंबई, नांदेड, औरंगाबाद, बीड, ठाणे, पालघर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, बुलढाणा, लातूर, आदी जिल्ह्यांसह अनेक गावांतून प्रतिसाद मिळाला, अशी माहिती एसएफआय राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड आणि राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी दिली.