मुंबई: उद्याने वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच प्राधान्य देतो, कारण निसर्गाचे महत्त्व मानवी आयुष्यात खूप मोठे आहे. त्यामुळे झाडांवर प्रेम करा, असे आवाहन जर्मनीचे महापौर फ्रित्झ कुह यांनी मुंबईकरांना केले. तसेच स्टुटगार्ड हिरवेगार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून कार्यवाही केल्यामुळे शहराला ‘ग्रीन सिटी’ अशी ओळख मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई शहर आणि जर्मनीतील स्टुटगार्ड शहरांमध्ये सुरू झालेल्या ‘भगिनी शहर संबंधां’ना आज ५० वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन महापौर चंद्रकांत महापौर चंद्रकांत पडवळ यांच्या कार्यकाळात ११ मार्च १९६८ रोजी महापालिका ठराव क्र. २०८३ नुसार ‘भगिनी शहर संबंध’ प्रस्थापित करण्यात आले. यानुसार दोन्ही शहरांत गेल्या ५० वर्षांपासून सांस्कृतिक, व्यापार, कला, संगीत, नाट्य क्षेत्रात देवाणघेवाण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई पालिकेत स्टुटगार्ट शहराचे महापौर फ्रित्झ कुह यांनी नगरसेवक, नगरसेवक, प्रशासकीय अधिकार्यांसह महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी आगामी काळात हे संबंध आणखी दृढ करणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘मुंबई-स्टुटगार्ड’ मैत्रीच्या नव्या अध्यायाला बुधवारी सुरुवात झाली. तसेच स्टुटगार्डमधून आलेले परदेशी पाहुणे एतिहासिक असलेल्या महापालिकेच्या प्रेमात पडले.
दरम्यान, मुंबई आणि स्टुटगार्ड मैत्रीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पालिकेत आलेल्या स्टुटगार्डच्या शिष्टमंडळाने पालिकेतील आपत्कालीन नियंत्रण कक्ष, महापालिका सभागृह आणि पालिकेच्या जुन्या इमारतीची पाहणी केली. शिष्टमंडळाने महापौरांसह सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून एकमेकांच्या साथीने दोन्ही शहरांच्या विकासाबाबत चर्चा केली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख आदी उपस्थित होते. सायंकळी महापौर बंगला येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.