
Ulhas Phatak

Anand Khambe
मुंबई, दि. 6 : जनता दल (से) मुंबई पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अपना परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नायगाव-वडाळा तालुका अध्यक्षपदी अानंद खांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उल्हास फाटक हे अपना बँकेचे माजी संचालक तसेच नव्या पीढीतील व्यावसायिक आहेत. जनता दलाशी संलग्न असलेल्या अपना परिवाराच्या माध्यमातून परळ, नायगाव, वडाळा, दादर या भागात ते सक्रिय आहेत. त्यांच्याच जोडीला नायगाव-वडाळा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी युवा जनताचे माजी अध्यक्ष राहिलेल्या अानंद खांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपना बाजार, अपना बँक या संस्थांमुळे एकेकाळी नायगाव-वडाळा-भोईवाडा-परळ या परिसरात जनता दलाचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे याच परिसरातील आणि अपना परिवाराशी संबंधित असलेल्या उल्हास फाटक तसेच अानंद खांबे यांची पक्षाने निवड केली आहे.
पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून त्या दृष्टीने जनता दलाचे संघटन मजबूत करण्यासाठी हे बदल करण्यात येत असल्याचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले. तर सरकारने अलिकडेच केलेल्या कायद्यातील बदलांमुळे मुंबई शहरातील जुन्या इमारती आणि त्यातील रहिवाशी, भाडेकरू यांच्या समोरील समस्या वाढल्या आहेत. दुसरीकडे पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळेही संबंधित रहिवाशांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असून त्यासाठी नायगाव-वडाळा भाडेकरू संघ ही संघटनाही सक्रिय करणार असल्याचे श्री. फाटक आणि श्री. खांबे यांनी म्हटले आहे.














