रत्नागिरी : कोरोना रोखून रत्नागिरीकरांनी शिस्तीचे दर्शन घडविले आहे, त्यामुळे 03 मे नंतर जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याला प्रथम संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी केले आहे.
आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी समस्त जिल्हावासींयांना एका व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी जिल्ह्यातील नागरिक आणि सर्व शासकीय यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) अर्थचक्र थांबले आहे. हे अर्थचक्र पुन्हा सुरु व्हावे आणि जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील संपूर्ण राज्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले.
शिमग्यासाठी जिल्ह्यात आलेल्या आणि अडकलेल्या चाकरमान्यांना परत त्यांच्या गावापर्यंत पाठविण्याचे नियोजन सुरु आहे. याबाबतीत अंतिम निर्णय होताच ते आपणास अवगत करण्यात येईल असे सांगून येणाऱ्या काळात कोरोना येणारच नाही असे नाही, त्यामुळे प्रत्येकजणाने आपले आजवरचे सहकार्य कायम ठेवावे असे आवाहन ॲङ अनिल परब यांनी या संदेशात केले आहे.