मुंबई, दि. १६ : समाजवादी परिवारातील एक संस्था असलेल्या नायगाव वडाळा भाडेकरू संघाच्या अध्यक्षपदी जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
वडाळा येथील सहकार नगरची स्थापना झाली त्यावेळी परिसरातील भाडेकरूंचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजवादी चळवळीतील तरुणांनी एकत्र येऊन भाडेकरू संघाची स्थापना केली होती. संघाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी गावंड यांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. जनार्दन मांजरेकर हे या आधी १९ वर्ष अपना बँकेचे संचालक होते. दक्षिण मुंबईत उपकर प्राप्त इमारतींचा प्रश्न मोठा असून, या रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत बोलताना श्री. मांजरेकर यांनी सांगितले.