रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जमिन खरेदीत सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक ओटवणेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
संजय साळवी यांनी सुरेंद्र साळवी याला त्यांच्या सामाईक मालकीची कसोप गावची जमीन विक्री करण्याकरता वटमुख्तारपत्र करुन दिले होते. सन २०१२ ते २०१७ या कालावधीत या चार संशयित आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने वटमुख्तारपत्रातील पान क्र. १ ते ३ मधील मजकुरात बदल करुन, त्या मजकुरात कसोप ऐवजी भंडारपुळे असा उल्लेख करुन, २७ जमिनींचे बनावट मुख्तारपत्र तयार केले. हे बनावट मुख्तारपत्र स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन, संजय साळवी यांच्या मालकच्या जमिनीची विक्री करुन, त्यांची ७६ लाखांची फसवणूक केली. सुरेंद्र व्यंकटेश साळवी (झाडगाव, रत्नागिरी), शकील हमीद डिंगणकर (नेवरे, रत्नागिरी), अल्ताफ जाफर संगमेश्वरी (एमआयडीसी, रत्नागिरी) आणि इम्तियाज आ. रेहमान मुजावर (एमआयडीसी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ४ संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द संजय मधुकर साळवी (५५, रा.साळवी रेसीडेन्सी पनवेल, जि. रायगड) यांनी सोमवार, दि १२ फेब्रुवारी २०१८ रोजी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत ग्रामीण पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ओटवणेकर करत आहेत.