डोंबिवली, (प्रशांत जोशी) : औद्योगिक विकास मंडळाच्या जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रांसह इतर सर्व इमारती जुन्या झाल्य असून त्या धोकादायक झाल्या आहेत.जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रांसह इतरही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एम्लाईज युनियनने केली आहे.
युनियनचे सचिव राजेंद्र मुणनकर यानी या संदर्भात मंडळाच्या एका बैठकीत वरील मागणी केली आहे.ते म्हणाले,महामंडळाच्या पाणी पुरवठा केंद्रातील इमारती पंपिंग स्टेशन,फिल्टर प्लँन्ट,तसेच इतर बांधकामे बऱ्याच वर्षापूर्वीची असून पाणी पुरवठा केंद्रातील अशुध्द पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी जे रासायनिक घटक वापरावे लागतात त्या रासायनिक प्रक्रीयेमुळे फिल्टर वॉश टँक व बाजूच्या इमारती डॅमेज झाल्या आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून महामंडळाच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावी अशी मागणी मंडळाच्या सभेत करण्यात आल्याचे त्यानी सांगीतले.
याशिवाय अनुकंपा तत्वावरील नेमण्यात आलेले कर्मचारी रोजंदारीवर काम करत असून त्यांना आस्थापनावर नेमण्यात यावे,कर्मचाऱ्याना ग्रॅच्युइटी रक्कम ७ लाख मिळते ती १० लाख रुपये करण्यात यावी,सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवृती सोहळ्यायासाठी १५०० रुपये दिले जातात ते ४५०० रुपये करावे, निवृत्त माजी सैनिक व समांतर आरक्षणावरुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचे वेतन निश्चित करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्याचे त्यानी सांगीतले. या पैकी इतरही मागण्या असून जर मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा त्यानी दिला.