सोलापूर : जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, हे अभियान आता शासनाचे राहिले नसून ते जनतेचे झाले आहे. लोकसहभाग हाच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सांगोला तालुक्यातील मानेगाव व डोंगरगाव येथील जलयुक्त शिवार योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार गणपतराव देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पंचायत समितीचे सभापती मायाक्का यमगर, उपसभापती शोभा खटकाळे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर, मानेगावचे सरपंच नारायण बाबर, उपसरपंच शोभा मोरे, जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण देवरे, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, प्रशिक्षणार्थी उप विभागीय अधिकारी वर्षाराणी भोसले, तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असून येथील लोकांना जलसंधारणाचे महत्व पटले आहे. त्यामुळे या तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. मानेगाव सारख्या गावात ८० टक्के क्षेत्रात कंपार्टमेंट बंडींगची कामे झाली असल्याने या परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरणार आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत,यावर्षीही जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत.
गेल्या काही दिवसात मी राज्याचा दौरा केला असून राज्यभर जलयुक्त शिवार अभियानाबाबत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोज हजारो नागरिक जलयुक्त शिवार योजनेत श्रमदानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. लोकसहभाग हेच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य आहे. लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणे शक्य नाही. लोकसहभाग हाच या योजनेचा कणा आहे. आता ही योजना शासनाची राहिली नसून ती लोकांची झाली आहे. या योजनेत लोकांना मदत करणे हेच शासनाचे काम आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील १२ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मानेगाव येथे बांधण्यात येत असलेल्या घरकुलाच्या कामाची पाहणी केली. या घरकुलाचे लाभार्थी विठ्ठल भडंगे व रुक्मिणी भडंगे यांच्याशी संवाद साधला. तसेच मानेगाव येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कम्पार्टमेंट बंडींगच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर लालासो बाबर व दशरथ बाबर या शेतकऱ्यांच्या विहीर पुनर्भरणाच्या कामाचीही पाहणी केली. तसेच या ठिकाणी असणाऱ्या ॲपल बेर व ऊसाच्या प्लॉटला भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतामध्ये कमी पाण्यात विविध प्रयोग करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
त्यानंतर डोंगरगाव येथील हरिभाऊ खंडागळे यांच्या शेतात उभारण्यात आलेल्या शेततळ्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ देण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मानेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण केला.