पुणे : आपल्या समाजाची मानसिकता ही उत्सवी आहे, जलयुक्तच्या माध्यमातून राज्यभर जलोत्सव सुरु आहे. हा उत्सवाचा उत्साह चिरकाल टिकण्यासाठी त्याला संस्थात्मक रूप देणे आवश्यक होते. जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून हे शक्य होणार असून महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त होण्यास मदत होणार असल्याचे सांगत या माध्यमातून जलविषयक जीवनशैली असणारी नवी फळी राज्यात तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभाग व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशदाच्या “संवाद” सभागृहात आयोजित जलसाक्षरता केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलबिरादरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, यशदाचे महासंचालक डॉ. आनंद लिमये, आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जलसंपदाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव च. आ. बिराजदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जलसाक्षरता केंद्राची मुहुर्तमेढ हा राज्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्यावतीने जलसाक्षरता केंद्राचे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन झाले आहे. या दोन्ही विभागाचे काम चांगले असून समाजात आवश्यक असणारी जलसाक्षरता या माध्यमातून रुजणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यभर सुरु असणारा जलोत्सवाचा जागर चिरकाल टिकेल. जलयुक्त शिवार अभियानाला संस्थात्मक रूप प्राप्त होऊन ती लोकांची जीवनशैली बनेल. या केंद्राच्या माध्यमातून जलविषयक कामाला आपल्या जीवनशैलीत आणणारी नवी फळी तयार करण्याचे काम सुरु आहे. या नव्या फळीच्या माध्यमातून पीक पद्धती,पाण्याचा वापर, काटकसर, उत्पादकता याची काळजी घेतली जाईल. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जलसाक्षरता केंद्राचे काम चांगल्या प्रकारे सुरु राहील. जलयुक्त शिवार अभियानात राज्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. मात्र,ही कामे करून थांबून उपयोग नाही. या कामातील सातत्य टिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेने जलविषयक जीवनशैली अंगिकारली पाहिजे.
राजेंद्र सिंह म्हणाले, महाराष्ट्र देवाचे आवडते अपत्य असून राज्यात भरपूर पाणी आहे. मात्र, या पाण्याचा योग्य वापर करणे जनतेला शिकविण्याची गरज आहे. जलसाक्षरतेमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील. महाराष्ट्र शासनाने जलसाक्षरता केंद्रांचे काम प्राधान्याने केले, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. देशातील सर्व राज्यात महाराष्ट्र शासन तत्पर आणि कार्यकुशल असून पूर आणि दुष्काळमुक्तीसाठी जलसाक्षरता आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि पाणी गावातच थांबणे आवश्यक आहे. या गोष्टी घडल्या तरच गावाचा व राज्याचा विकास होईल. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या अभियानात राज्यातील जनतेने ३०० कोटीची लोकवर्गणी दिली आहे. हा देशातील सर्वात चांगला उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील प्रमुख पाच नद्यांच्या खोऱ्यांतून आणलेल्या जल कलशाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हा कलश‘नमामि चंद्रभागा’ अभियानांतर्गत भीमा नदीच्या उगमापासून निघणाऱ्या जलयात्रेसाठी डॉ. राजेंद्र सिंह यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी ‘संत वाणीतील जलसाक्षरता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भीमा नदी खोरे जल साक्षरता यात्रा रथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.