रत्नागिरी (आरकेजी): गुजरात आणि हिमाचलप्रदेशातल्या भाजपच्या विजयानंतर त्याचा जल्लोष कोकणात सुद्धा पहायला मिळाला. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होमपीचवरील म्हणजेच गुजरात राज्यातल्या विधानसभा विजयानंतर कोकणातल्या भाजपकडून जल्लोष करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयाच्या बाहेर फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात भाजपनं या दोन राज्यात मिळवलेल्या यशाबद्दल विजयाचा जल्लोष करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ढोल ताशांच्या गजरात नाचत या विजयाचा आनंद साजरा केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह रत्नागिरी जिल्हा भाजपचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. गुजरातमधल्या या यशाबद्दल पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे आणि लाडू भरवत या विजयोत्सवाचा जल्लोष साजरा केला. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे कोकणात साजरा झालेल्या या जल्लोषाला सुद्धा विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.