मंत्रालयातील बैठकीत आ. भास्करराव जाधव यांच्याकडून बोगस कामांचा पर्दाफाश
मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडून तात्काळ कारवाईचे आदेश
मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे हा केवळ दिखावा असून २५ टक्केसुध्दा काम झाले नसल्याची गंभीर बाब शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी समोर आणली. ही बाब खरी असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनी मान्य करताच मंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ स्पेशल स्कॉड पाठवून गुहागरसह जिल्ह्यातील सर्व कामांची तपासणी, सखोल चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले.
जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा आणि जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा वेळेत तयार न झाल्याबाबत विधानसभेत विचारलेल्या तारांकीत प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री ना. पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक पार पडली. ही बैठक जलजीवनच्या कामांवरुन गाजली.
ज्यांची बाजारात पाचशे रुपयांचे साहित्य खरेदी करण्याची पत नाही अशा एकेका ठेकेदाराने शंभर – शंभर कोटींची कामे घेऊन ठेवली आहेत. ते कामे करत नाहीत. जिथे कामे झाली आहेत त्यांना बिलकुल दर्जा नाही आणि याला जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकुमार पुजार आणि कार्यकारी अभियंता श्रीमती मयुरी पाटील आहेत. या दोघांचा जिल्ह्यात संपर्क नाही. ते कुठल्याही कामाच्या ठिकाणी जात नाहीत आणि दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष करतात, ठेकेदारांशी साटेलोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा बोजवारा उडाला आहे, असा घणाघात आमदार श्री भास्करराव जाधव यांनी बैठकीत केला. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून संबंधितांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, यामागचे कारण काय, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
आमदार श्री. जाधव यांच्या एकही प्रश्नावर कार्यकारी अभियंता श्रीमती पाटील यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. किंबहुना त्या भलतेच उत्तर देत असल्याचे पाहून डॉ. अमित सैनी यांनी ‘खोटी माहिती बैठकीत देऊ नका’ अशा शब्दात त्यांना सुनावले आणि आमदार साहेबांनी सांगितले ते बरोबर आहे, हे पटवून देताना राज्यात रत्नागिरी हा एकमेव असा जिल्हा आहे की पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नेमलेली असताना बहुतांशी योजना जिल्हा परिषदेने स्वतःकडे घेऊन ठेवल्या आहेत. योजनांची कामे होण्यासाठी लागतील तेवढे इंजिनियर, कर्मचारी घ्या असे सांगूनही जिल्हा परिषदेने घेतले नाहीत, परिणामी जिल्ह्यात आमदार साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे, असे स्पष्ट केले.
हे सर्व ऐकून घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करीत मंत्री ना. पाटील यांनी जे ठेकेदार काम करत नाहीत त्यांना तात्काळ टर्मीनेट करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर झालेल्या दर्जाहीन कामांच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, ठाणे यांचे विशेष पथक तात्काळ गुहागरसह जिल्ह्यात पाठविण्याचेही आदेश त्यांनी दिले.
टंचाई आराखडा जानेवारीच्या अखेरपर्यंत तयार होऊन तो जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देताना ना. पाटील यांनी कोळकेवाडी धरणातून ग्रावीटीने पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमध्ये श्री. भास्करराव जाधव यांनी सुचविलेली चिपळूण तालुक्यातील कापसाळ आणि कामथे या गावांचा समावेश करण्याचे आदेशही ना. पाटील यांनी दिले.
बैठकीला प्रधान सचिव श्री. संजय खंदारे, डॉ. अमित सैनी यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पालांडे, जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री. प्रशांत भामरे, अधीक्षक अभियंता श्री. अजय सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.