
डोंबिवली : शुक्रवारी असणार्या आषाढी एकादशी आणि जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांनी गुरुवारी प्रभातफेरी आणि वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. प्रभात फेरीत विद्यार्थांनी पारंपारिक वेशभूषा करून व घोषणा देत आषाढी एकादशी आणि जागतिक लोकसंख्या दिनाबाबत जनजागृती केली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिवाई बालक मंदिर शाळेतील शिशु-बालवर्गातील चिमुकल्यांची दिंडी शाळेपासून एमआयडीसी विभागातील गणपती मंदिरपर्यंत काढण्यात आली होती. वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्यासाठी शाळेतील छोटे चिमुकले वारकरी आणि विठ्ठल रखुमाईच्या वेशात मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिंडीत पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दिंडीत मुलांनी आणि पालकांनी रिंगण करून विठ्ठल नामाचा गजर करून फुगड्या घातल्या. यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका बेडसे यांच्या मार्गदर्शनखाली शाळेचे शिक्षक आणि समिती सदस्य विध्यार्थांसमवेत प्रभात फेरीत सामील झाले होते. लोकसंख्या विषयी जनजागृती व पर्यावरणाचे रक्षण करा या विषयीचा संदेश प्रभात फेरीतून देण्यात आला.














