सिंधुदुर्ग : निसर्गसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व फळझाड लागवडीत भरपूर वाव आहे. या दोन्ही योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिकारी वर्गाने समन्वयाने कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे, असे मत कोकण विभागीयआयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळझाड लागवड, पर्यटन, खनिकर्म, भूसंपादन, जिल्हा नियोजन समिती आदी बाबत सविस्तर आढावा आयुक्त डॉ.पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उपविभागीयअधिकारी विकास सुर्यवंशी, निता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चौपदरी रस्ता अंतर्गत भूमिसंपादनबाबत झालेली कार्यवाही, फळझाड अंतर्गत यापूर्वी झालेली फळझाड लागवड यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट, खनिकर्म अंतर्गत रॉयल्टी वसुली, भूमिसंपादन लाभधारकांना मोबदला वितरण, पर्यटन प्रकल्पांची कार्यवाही आदी बाबत विभागीय आयुक्त डॉ.पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.