रत्नागिरी, (आरकेजी) : एकविसाव्या शतकात अंधश्रध्दा अद्यापही कायम आहे. याच अंधश्रध्देतून होणार्या बुवाबाजीला अनेक जण फसत असतात. असाच एक प्रकार रत्नागिरीजवळील भावेआडोम या गावात घडला आहे. येथील ग्रामस्थ विलास तांबे यांच्या बहिणीचा आजार बरा करतो, असे सांगून एका भोंदूबाबाने देवस्कीच्या नावाखाली दिड लाख किमतीचे सोन्याचे दागीने घेऊन पोबारा केला. भोंदुबाबा मजगाव येथील रहिवासी आहे.
मुश्ताक काझी (रा. मजगाव-रत्नागिरी) या संशयित भोंदुबाबा विरोधात पोलिसांनी जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. विलास तांबे यांच्या बहिणीची तब्येत बरी नव्हती. वैद्यकीय उपचार करूनही ती बरी होत नसल्याने तांबे यांची काझी याच्याशी ओळख झाली. काझी याने घराचे शुद्धीकरण करावे लागेल असे तांबे यांना सांगितल. त्यासाठी नारळ, लिंबू, लालपापड इत्यादी साहित्य अंगावरून काढून देवदेवस्की करण्यात आली.
तांबे व नातेवाईकांचे सुमारे दिड लाख रूपये किंमतीचे जुने वापरते सोन्याचे दागिने शुद्धीकरणासाठी काझी यांने मागवून घेतले. कुटुंबाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत काझीने तांबेंच्या घरी ये-जा सुरू केली. तुमच्या कुटुंबावर कुणीतरी करणी केलेली असून त्यासाठी १५ हजार रूपये खर्चासाठी मागून घेतले. त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या जीवाला मृत्यूचा धोका असल्याची भिती दाखविली. घरातील वस्तूही शुद्धीकरणासाठी दागिने काढून घेतले.
काझीशी संपर्क साधूनही दागिने देण्यास टाळाटाळ करत होता. त्याच्या टोलवाटोलवीला कंटाळून तांबे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार केली.