Mumbai, 8 July : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधित पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्त्वात बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने व अविरतपणे कोविड – १९ प्रतिबंध व उपचार विषयक सर्वस्तरीय कार्यवाही करीत आहे. महानगरपालिकेद्वारे अविरतपणे करण्यात येत असलेल्या सर्वस्तरीय कार्यवाहीची दखल देशातील व जगातील अनेक संस्थांनी आजवर घेतली असून, यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य विभाग, मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, नीति आयोग इत्यादी मान्यवर संस्थांचा समावेश आहे. याच शृंखलेत आता संयुक्त अमेरिकेच्या (United States of America) प्रतिनिधी गृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य श्री. जे. लुईस कोरीया यांनी महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांना आवर्जून पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीचे दखल घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. जे. लुईस कोरीया यांनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड साथरोगाच्या कालावधी दरम्यान केलेली विविधस्तरीय कामे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आहे. तसेच या अंतर्गत प्रामुख्याने विभागस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्याद्वारे गरजू रुग्णांना रुग्णशय्यांचे वितरण संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार व संसर्गाच्या प्रभावानुसार रग्णालयात दाखल करुन उपचार करणे, गरजू रुग्णांना योग्यप्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींचा श्री. कोरीया यांनी त्यांच्या पत्रात आवर्जून उल्लेख केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबविलेले सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना व करण्यात आलेले उपचार यामुळे एप्रिल महिन्यात जवळजवळ ३० टक्के इतका असणारा बाधित होण्याचा दर आता ४ टक्क्यांवर आला आहे. ही बाब नमूद करत श्री. कोरीया यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविधस्तरीय बाबी या व्यवस्थापन कौशल्याचे अत्युकृष्ट उदाहरण असल्याचेही नमूद केले असून महापालिका आयुक्तांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे. तसेच श्री. चहल यांचे कार्य हे प्रशासकीय सेवेतील कनिष्ठ सहका-यांसाठी अनुकरणीय असल्याचेही श्री. कोरीया यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.















